औरंगाबाद : नगरसेवक ते राज्यसभा खासदार असा वेगवान आश्चर्यकारक प्रवास करणारे डॉ. भागवत कराड मराठवाड्यातील एकमेव राजकीय नेते ठरले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून राजकीय संघर्ष करीत विधिमंडळाच्या सर्वात सर्वोच्च सभागृहात पोहोचण्याचा पराक्रम त्यांनी केला. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्षपदाच्या काळात विकास कामांसाठी केलेली तळमळ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत भरली. अन त्याच वेळी राज्यसभेसाठी साखरपेरणी झाल्याची प्रामाणिक कबुली डॉ. भागवत कराड यांनी दै. सांजवार्ताशी बोलताना दिली.
अहमदपूर जि.लातूर तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या डॉ. भागवत कराड यांचा नगरसेवक ते राज्यसभा खासदार असा प्रवास कमालीचा संघर्षमय राहिला. ग्रामीण भागातील दारिद्र्याचे चटके सहन केलेल्या या नेत्याला आता सर्वोच्च सभागृहात मराठवाड्याचे प्रश्न मांडण्याची संधी मिळते आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष पदाच्या काळातच राज्यसभेची साखरपेरणी झाली.
काल शुक्रवारी डॉ. कराड यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता ही निवड जवळपास बिनविरोध झाल्यात जमा आहे. एका अर्थाने डॉ. कराड आता राज्यसभेचे खासदार बनले आहेत. विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याचा बहुमान मिळवलेले कराड मागे वळून पाहताना भावूक झाले. अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे रहिवाशी कराड कुटुंबाकडे सात-आठ एकर कोरडवाहू शेती होती. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण घेताना दररोज पाच किलोमीटरची पायपीट त्यांना करावी लागली. पायात घालायला चप्पल ही मिळत नव्हती. हायब्रीड भाकरी आणि पिठलं खाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ओबीसी कोट्यातून त्यांना मेडिकल साठी प्रवेश मिळाला अन औरंगाबादला यावे लागले. अत्यंत गरीब घरातील या गुणी विद्यार्थ्याला डॉ. वाय. एस. खेडकर यांनी हेरले अन सर्वतोपरी मदत केली, असे कराड अभिमानाने सांगतात. आयुष्य स्थिरस्थावर झाल्यावर 1995 ला ते अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आले. त्यानंतर त्यांना महापौरपदाची संधी मिळाली.
मराठवाड्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडले
दोन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर डॉ. कराड यांना गेल्या वेळी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळचे अध्यक्ष पद मिळाले. या संधीचे त्यांनी अक्षरशः सोने केले. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासह इतर अनुशेषाचा बारकाईने अभ्यास केला. शेकडो बैठका घेतल्या. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकार्यांशी, कृषी तज्ञांशी चर्चा केली. अत्यंत अभ्यासपूर्ण प्रत्येक जिल्ह्याचा डाटा बनविला. मराठवाड्याच्या दुष्काळाच्या प्रश्नावर अनेक व्याख्याने आयोजित केली. तज्ञांचा अहवाल प्रशासकीय अधिकार्यांच्या टिप्पण्या ही सर्व माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी वारंवार चर्चा करून मराठवाड्याचे प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची तब्बल चार वेळेस भेट घेत मराठवाड्यासाठी निधीची मागणी केली. अध्यक्षपदाच्या काळात डॉक्टरांनी रेकॉर्डब्रेक काम केले. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी वारंवार भेट होत गेली. डॉक्टर कराड यांची विकास कामाबद्दल असलेली तळमळ या नेत्यांच्या नजरेत भरली अन राज्यसभेचा मार्ग सुकर झाला. एकंदरीत डॉ. भागवत कराड यांना पक्षाने त्यांच्या कामाची पावतीच दिल्याची भावना आता व्यक्त होत आहे.